औरंगाबाद - नोकरी आणि लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशिद (वय ३५,रा.टाऊनहॉल परिसर) याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी टाऊन हॉल परिसरातून सिटीचौक पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वीही दंगल प्रकरणात मतीनला सिटीचौक पोलिसांनी अटक केली होती.
नवऱयापासून विभक्त झालेली एक महिला रशीदपुरा परिसरात राहते. एक वर्षापूर्वी ही महिला स्वत:चे आधार कार्ड बनवण्यासाठी नगरसेवक मतीनच्या कार्यालयात आली होती. यादरम्यान मतीनची आणि महिलेची भेट झाली. मतीनने महिलेला आधार कार्डासह चांगली नोकरी मिळवून देतो, असे आश्वासन देऊन जवळीक निर्माण केली. त्यानंतर मतीनने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि रशीदपुरा आणि टाऊन हॉल येथे नेवून तिच्यावर अत्याचार केले. तसेच काही दिवसानंतर त्याने तिला लग्नास नकार दिला आणि याबाबत कोणला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी पीडितेने जानेवारीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात मतीनविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मतीनने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. शुक्रवारी सिटीचौक पोलिसांनी त्याला टाऊन हॉल परिसरातून अटक केली.