औरंगाबाद - जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चालला आहे. औरंगाबादमध्ये रोज किमान शंभर नव्या रुग्णांची भर पडत आहे. अनलॉक झाल्यावर कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. त्यामुळे, आता जिल्हा परिषदेने विशेष उपाययोजना करायला सुरुवात केली आहे.
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांना तपासणीसाठी शहरात आणले जाते. यामध्ये रुग्णासोबत असलेल्या लोकांना बाधा होण्याची भीती जास्त असते. त्यामुळे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वॅब घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी शहरात येणार नाही, याची खबरदारी घेतली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंडावले यांनी दिली.
जिल्ह्यातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 3306 झाली आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यावर जवळपास दोन महिने ग्रामीण भागात एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आल्याने ग्रामीण भागात अनेकजण आल्याने भागात कोरोनाचा शिरकाव झाला. गंगापूर तालुक्यात ग्रामीण भागातील पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर हळूहळू कोरोनाचा ग्रामीण भागात फैलाव झाला. आता रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा परिषदतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत.
ग्रामीण भागातील उपाययोजना -
ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन देण्याची प्राथमिक व्यवस्था करण्यात आली आहे. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना शहरात हलवताना ऑक्सिजन मिळत राहावे यासाठी रुग्णवाहिकेत विशेष सुविधा करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी आणि उपचार त्याचठिकाणीच व्हावेत यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रत्येक गावात लोकांची तपासणी केली जात आहे.
वाळूज, पंढरपूर, पिसादेवी या भागात रुग्णांची वाढती संख्या पाहता ग्रामपंचायतींनी गावात जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, तीन दिवस व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न करत असल्याचे डॉ. मंगेश गोंडावले यांनी सांगितले.