औरंगाबाद - महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मराठवाड्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. काल (रविवार) दिवसभरात ८ जिल्ह्यांमध्ये ३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यात आता वेगवेगळ्या उपाय योजना करण्यात येत आहेत. तरीही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. आता नांदेड जिल्ह्यात २४ मार्चपासून कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तर, औरंगाबादमध्ये देखील अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. सध्या येथे अंशतः लॉगडाऊन आहे. त्यानुसार, येथे रात्री ८ वाजपल्यानंतर बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - रविवारी राज्यात तब्बल 30 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद, 99 जणांचा मृत्यू
अनेक उपाय योजनानंतरही कोरोनाचा उद्रेक -
काल दिवसभरात औरंगाबादमध्ये १४३२ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तर, ११ जणांचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात ९२७ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. ९ जणांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यात २२१ नवे रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात ७० रुग्ण आढळले असून १ जणाचा मृत्यू झाला. बीडमध्ये ३३६ नवे रुग्ण आढळले, सुदैवाने एकही मृत्यू नाही. लातूरमध्ये ३७७ नवे रुग्ण आढळले, २ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद जिल्ह्यात ११८ नवीन रुग्ण आढळले असून जणांचा मृत्यू झालाय. जालन्यात ५३७ नवे रुग्ण आढळले असून ४ जणांचा मृत्यू झालाय. अशा पद्धतीने कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं चित्र मराठवाड्यात पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - उत्तराखंड मुख्यमंत्र्याची मानसिकता महिलांवरील गुन्ह्यांना प्रोत्साहित करते - जया बच्चन
कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला -
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला असून पॉझिटिव्हिटी रेट देखील वाढला आहे. पंधरा दिवसांपूर्वी शंभर चाचण्यांमध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येत होता. आता तोच रेट ३२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वीच जिल्ह्यात रोज २० ते ४० रुग्ण आढळून येत होते. तोच आकडा आता पंधराशेच्या वर गेला आहे. हीच अवस्था मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.