औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. या पथकामध्ये सहा जणांचा समावेश असून, सोमवारी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाचा आढावा या पथकाकडून घेण्यात येणार आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
दुष्काळवाडा अशी ओळख झालेल्या मराठवाड्यात यंदा अतिवृष्टी झाली. विभागातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. ऐन पीक काढणीच्या वेळेला पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यामध्ये झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी याआधीच दौराकरून मराठवाड्याची परिस्थिती जाणून घेतली होती. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर पाहाणीसाठी केंद्राचे पथक मराठवाड्यात दाखल झाले आहे. रविवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय पथकाने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.
पथकातील अधिकारी करणार शेतकऱ्यांशी चर्चा
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत पाहाणी करण्यासाठी सहा जणांचं पथक दाखल झाल असून, सोमवारी सकाळी तीन अधिकारी औरंगाबादेत तर तीन अधिकारी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांचा पाहणी दौरा करणार आहेत. मराठवाड्यात कापूस, मका आणि सोयाबीन या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झले आहे. नुकसान होऊन दोन महिने झाल्याने नुकसानाचे पुरावे नसले, तरी त्यावेळी करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारावर हे पथक नुकसानीचा आढावा घेणार आहे. तसेच या पथकातील अधिकारी शेतकऱ्यांशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती सुनिल केंद्रेकर यांनी दिली.