औरंगाबाद- कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांवर उपचार करत असताना व्हेंटिलेटर कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शहरातील उद्योजकांनी कृत्रिम श्वास देणारे छोट यंत्र तयार केले आहे. हे यंत्र कृत्रिम श्वासाची गरज असलेल्या रुग्णांच्या कामी येणार आहे.
रुग्णालयात असणारे व्हेंटिलेटर साधारणतः १२ ते १५ लाखांच्या किंमतीत मिळतात. मात्र, व्यापाऱ्यांनी तयार केलेले हे मिनी व्हेंटिलेटर ५० हजारांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, छोट्या रुग्णालयात देखील गरजू रुग्णांना कृत्रिम श्वास घेण्याची गरज असल्यास ती गरज भागवता येणार आहे. शहरातील ग्राउंड मास्टर या कंपनीने हे छोटे व्हेंटिलेटर तयार केले आहे. 'प्राण' असे या छोट्या व्हेंटिलेटरचे नाव आहे. हे व्हेंटिलेटर अंबू बॅगची एक बॅग ( बॅग वॉल्व मास्क व्हेंटिलेटर) ची स्वयंचलित आवृत्ती आहे.
प्राण व्हेंटिलेटर ब्रिदिंग असिस्टंस व्हेंटिलेटर सारखे अद्यावत नसले तरी श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी फायद्याचे असणार आहे. ग्रामीण भागात जिथे विजेचा तुटवडा असतो, कोणतेही तज्ञ उपलब्ध नसतात तिथे हे यंत्र उपयोगी पडणार आहे. हे यंत्र हाताळण्यासाठी कोणाचीही गरज नसून ते पूर्णतः स्वयंचलित असल्याने फायदेशीर असल्याचे मत ग्राउंड मास्टरचे मिलींद केळकर आणि उद्योजक राम भोगले यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कन्नड शहरात निर्जंतुकीकरण फवारणी