औरंगाबाद - रात्री संचारबंदी सुरू असताना एका महिला डॉक्टरच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. प्रतापनगर परिसरात बुधवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पोलीस आयुक्तांसह, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. संचारबंदी सुरू असताना मोठी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सर्व मुद्देमाल सुरक्षित -
प्रतापनगरात येथील रहिवासी असलेल्या दंतरोग चिकित्सक डॉ. सुषमा सोनी, मुलीवर शस्त्रक्रिया करायची असल्याने आठ दिवसांपूर्वी तिरुपती शहरात गेल्या आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे पती जयंत हे सुद्धा तिरुपतीला रवाना झाले. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांचा नोकर वाहन धुण्यासाठी बंगल्यात आला तेव्हा त्याला कुलूप तुटल्याचे दिसले. त्याने तत्काळ सोनी यांना फोनवर कल्पना दिली. सोनी यांनी त्यांचे मित्र व निवृत्त सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र मेघराजानी यांना याबाबत कळवले. त्यांच्यामार्फत चोरीचे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. सुरुवातीला सोनी यांच्या बेडरूममधून १०० तोळे सोने व १० लाख रुपये रक्कम चोरीला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बंगल्याची तपासणी सुरू झाली. परंतु काही तासांनंतर सोने असलेल्या खोलीकडे चोरांचे लक्षच गेले नसल्याने काहीच ऐवज चोरीला गेला नसल्याचे पोलिसांतर्फे सांगण्यात आले.
पोलीस ठाण्यापासून केवळ ६०० मीटरवर घडली घटना -
मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतर संचारबंदी लागू झाल्याने नागरिकांच्या फिरण्यावर प्रतिबंध लागले. ५५ चारचाकी व २५ दुचाकींवर पोलीस गस्त घालणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मोठा फौजफाटा रस्त्यावर असतानाही उस्मानपुरा पोलीस ठाण्यापासून केवळ ६०० मीटर अंतरावर असलेल्या भागात चोरट्यांनी घरफोडी केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक घरफोडी, मंगळसूत्र चोरी, दुचाकी चोरी, चंदनचोरीच्या घटना घडत आहेत.