औरंगाबाद- ज्या देशाने आपल्या मातृभाषेत शिक्षण द्यायला सुरुवात केली, त्या देशाची उन्नती झाली. चीनमध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये इंग्लिश शिकवली जात आहे. मात्र, त्यांनी त्यापूर्वीच मातृभाषामध्ये आपले सर्व शिक्षण घेतलेले आहे. त्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
हेही वाचा- दिल्लीत पुन्हा केजरीवाल सरकार; नागपुरात 'आप' कार्यकर्त्यांचा 500 किलो मिठाई वाटून जल्लोष
दीक्षांत समारंभात प्रातिनिधिक स्वरुपात काही पदवीधारकांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वत्त, कुसचिव डॉ. गणेश मंझा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विधि विभागाच्या नवीन व सुसज्ज इमारतीचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विधि विभागाच्या इमारतीसाठी साडेतीन कोटी रुपयांच्या निधी मंजूर केला होता. मात्र, इमारतीसाठी आजपर्यंत ६ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. विधि विभागाच्या नवीन इमारतीत एक सेमिनार हॉल, आठ वर्ग खोल्या, ग्रंथालय, वाचन कक्ष, संगणक प्रयोगशाळा दालने, विभागप्रमुख, प्राध्यापकांचे कक्ष अशा अत्याधुनिक सुविधा आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘जलदूत‘ या स्वयंसेवी संस्थेतर्फे बंधाराही उभारण्यात आला आहे.