औरंगाबाद - जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध शिथिल करण्याचे आदेश शुक्रवारी मध्यरात्री काढले. त्यामुळे येत्या सोमवारपासून जिल्ह्यात अनलॉक होणार आहे.
व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण -
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारने 'ब्रेक दि चेन' या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध लागू केले. या निर्बंधाची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे राज्यातील वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास राज्य सरकारला यश आले. राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर पाच टक्के पेक्षा कमी आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेल्या असतील अशा जिल्ह्यांना अनलॉक करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. या नव्या आदेशात औरंगाबाद जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवारपासून औरंगाबाद अनलॉक होणार असल्याने नागरिकांसह व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तरीपण काळजी घेणे आवश्यक -
जिल्ह्याची रुग्णसंख्या असल्यामुळे अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. आता जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत होणार आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी कोरोना संपला या भ्रमात न राहता नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास प्रशासनाला पुन्हा लॉकाडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.