औरंगाबाद - महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. ही नेमणूक झाल्यानंतर आस्तिककुमार पांडेय यांनी लगेचच कामकाजाला सुरुवात केली आहे. महापौर आणि उपमहापौर यांची एक समिती निर्माण करावी, या समितीची प्रत्येक 15 दिवसांनी बैठक घ्यावी, असे निर्देश नगरविकास खात्यांच्या सचिवांनी दिले आहेत.
28 एप्रिल रोजी औरंगाबाद महानगरपालिकेतील 115 नगरसेवकांचा कार्यकाळ संपला. हा कार्यकाळ वाढवून देणे शक्य नसल्याने आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत सर्वच ठिकाणी सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत.
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे कार्यकाळ पूर्ण होऊनही निवडणूक घेण्यात आल्या नसल्याने कार्यकाळ संपलेल्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेत प्रशासक म्हणून आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांची नेमणूक करण्यात आली आहे. महापौर, उपमहापौर आणि पदाधिकारी यापुढे सल्लागार म्हणून काम पाहतील.