गंगापूर(औरंगाबाद) - अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन वेतनश्रेणी लागू करावी. अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करण्यात यावी. मिनी अंगणवाडी सेविकांना मोठ्या अंगणवाडी सेविकेइतकेच मानधन देऊन त्यांची मानधनातली तफावत दूर करण्यात यावी. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यात यावे अशा मागण्यांसाठी आयटकच्या अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गंगापूर तहसिल कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सरकारविरोधात जोरदार घोषणा - आयटकचे राज्य उपाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष प्रा.कॉम्रेड राम बाहेती, राज्य कौन्सिल सदस्या कॉम्रेड शालिनी पगारे, तारा बनसोडे, विलास शेंगुळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीसानी सहभाग नोंदवला. मोर्चा दरम्यान सरकारविरोधात मानधनवाढीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
बेमुदत संपाचा इशारा - वेतनश्रेणी लागू करावी किंवा मानधनात वाढ करावी. शासनाने नवीन मोबाईल संच उपलब्ध करून द्यावेत, २०१८ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवा समाप्ती लाभाची थकीत रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या रिक्त जागा तात्काळ भराव्यात, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. २६ जानेवारीला मुख्यमंत्री घोषणा करणार असल्याबाबत आश्वासन दिले आहे. समाधानकारक घोषणा झाल्यास ठीक अन्यथा २७ जानेवारी नंतर आयटक केव्हाही बेमुदत संप पुकारणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसील कार्यलय येथे नायब तहसीलदार, बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी स्वीकारले.
यांच्यासह अंगणवाडी सेविका मोर्च्यांत सहभागी - यावेळी मीरा गायके, रेखा केरे, चंचल खंडागळे, साधना दुशिंग, वंदना संघवी, ज्योती गारदे, सुमन प्रधान, सीमा व्यवहारे, निर्मला ठेंगडे, उज्वला मुळे, मंगल घोडके,ज्योती रनयेवले, टीबी पवार, शीला एडके, सुनीता मुळे, शंकूतला साळवे, नंदा शेजवळ, लतीफा पठाण, ज्योती कोरडकर, वसुंधरा पांडव, ज्योती कोल्हे, उषा गायकवाड, सुनीता सुतार, सोनाली जाधव, गीता ठोंबरे, सुनीता वाघुले यांच्यासह तसेच गंगापूर तालुक्यातील विविध विभागातील शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिस सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा - March in Pusad : लव जिहाद धर्मांतरण, गोहत्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुसदमध्ये मोर्चा