वैजापूर (औरंगाबाद) - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा कोणीही गर्दी करू नये असे आवाहन शासन, प्रशासनाने केले आहे. मात्र, वैजापूर तालुक्यात कोरोनावर मात केलेल्या एका नेत्याच्या स्वागतासाठी एमआयएमने चक्क रॅली काढल्याचे पाहायला मिळाले. या रॅलीत अनेकांनी मास्कदेखील घातला नव्हता. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.
वैजापूर येथील अकिल शेठ नावाच्या एमआयएमच्या नेत्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. रविवारी रात्री त्यांनी कोरोनावर मात केल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले. एरवी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाचे स्वागत करुन उत्साह वाढवला जातो. असे करत असताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. मात्र, या नेत्याच्या स्वागतासाठी सर्रास गर्दी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कार्यकर्त्यांनी यावेळी फुले उधळली, फटाके फोडले, इतकेच नाही तर प्रचंड गर्दी करीत गाडी समोर ठेकाही धरला. या नेत्याच्या गाडीसोबत हे हुल्लडबाज कार्यकर्ते नेत्याच्या घरापर्यंत गेले. मात्र, हा नेताही गर्दी पाहून परिस्थितीचे गांभीर्य विसरला. त्याने मोठ्या स्टाईलने लोकांचे अभिवादन स्वीकारत धन्यवाद दिले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याने मात केली आहे, असे चित्र निर्माण झाले होते. या रॅलीत सर्वांना कोरोनासारख्या महाभयंकर आजाराचा विसरच पडला.
याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात वैजापूरचे उपनगराध्यक्षही उपस्थित होते, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सर्व नियम धाब्यावर बसवून रॅली काढणे गरजेचे होते का? असा प्रश्न नियम पाळणाऱ्या सर्वसामान्यांनी उपस्थित केला आहे. तसेच कोरोनाने कहर केला असताना नेत्यांची ही चमकोगिरी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे, हे या नेत्यांना कधी कळणार हा प्रश्नच आहे.