औरंगाबाद - पैठणमध्ये आजपासून नाथ षष्ठी ( Nath shashti festival Paithan ) सोहळ्याला सुरवात झाली आहे. दोन वर्षांनंतर वारकऱ्यांना नाथ षष्ठीचा आनंद उत्सव सोहळा साजरा करता येणार आहे. आज विजयी पांडुरंगास महाभिषेक, वारकरी पूजन, संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचे चित्रप्रदर्शन, कुलोत्पन्न नाथवंशजांची मानाची दिंडी, महाप्रसादाचा कार्यक्रम होत असून 24 मार्च रोजी सप्तमीच्या दिवशी छबिना व गुरुपूजन होईल. 25 मार्च रोजी अष्टमीच्या दिवशी काला दही हंडीचा कार्यक्रम असेल.
हेही वाचा - World meteorological day 2022 : उष्णता शोषून घेणारी व्यवस्था निर्माण करण्याची गरज - डॉ. सतीश पाटील
पैठण नाथ षष्ठी वारी ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची वारी समजल्या जाते. पैठण नाथ षष्ठी सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. कार्तिकी आणि आषाढीला पंढरपुरात वारीचा सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. त्या खालोखाल नाथ षष्ठीचा सोहळा साजरा होतो. कोरोना नंतर पैठण येथे राज्यभरातून लाखोच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मुख्य पालखीसोबत जवळपास 600 दिंड्या राज्यभरातून पैठणमध्ये दाखल झाल्या आहेत.
संत एकनाथ महाराज यांचे गुरू जनार्दन स्वामी आहेत. जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी ते याच दिवशी म्हणजे षष्ठीला साजरी करत होते. स्वतः नाथ महाराजांनीही याच दिवशी जलसमाधी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, हा दिवस नाथ षष्ठी म्हणून भाविक साजरा करतात. पैठण येथे वाळवंटी कीर्तनदेखील होतात. पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाला पंचपर्व असे देखील म्हणतात.
पहिल्या दिवशी रांजण पूजा केली जाते. भगवान श्रीकृष्णांनी श्रीखंड्याच्या रुपात ज्या रांजणात पाणी भरले होते त्याची पूजा केली जाते. दुसरा दिवस पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मानकऱ्यांना उत्सवाचे आमंत्रण दिले जाते. तिसऱ्या दिवशी षष्ठी साजरी करण्यात येते. षष्ठीच्या दिवशी पहाटे 2 वाजता पांडुरंगाच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. नाथवंशजांची पहिली मानाची पालखी गावामधील मंदिरातून नाथ समाधीकडे निघते. समाधी मंदिरात नाथ वंशजांच्या वतीने कीर्तन करण्यात येते. येथील कार्यक्रम संपल्यानंतर गावातील मंदिरात आरती केली जाते.
विविध ठिकाणांवरून आलेल्या दिंड्या नगर प्रदक्षिणा पूर्ण करून गोदाकाठी असलेल्या मठात जातात. चौथ्या दिवशी सप्तमीला पैठण नगरीतून रात्री 12 वाजता नाथांच्या पादुकांची मिरवणूक काढण्यात येते. त्यास छबिना म्हणतात. छबिना पहाटेच्या वेळी वाळवंटात म्हणजे गोदाकाठी आल्यानंतर त्यांना गंगास्नान घालण्यात येते. मग याच ठिकाणी वाळवंटात भारुडाचा कार्यक्रम होतो. सकाळी सात वाजता छबिना पालखी घेऊन वारकरी मंदिरात येतात. त्यानंतर दिवसभर वाळवंटात कीर्तनाचे आणि भारुडाचे सोहळे सुरू होतात. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविक वाळवंटी कीर्तनात दंग होऊन नाचतात.
पाचव्या दिवशी अष्टमीला काल्याचा कार्यक्रम असतो. या दिवशी दुपारी 4 वाजता नाथ मंदिरातून काला दिंडी प्रस्थान करते. दिंडी उदासीमठाच्या पायऱ्याजवळ आल्यावर पावल्या खेळल्या जातात. हा भक्तिपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यात भरण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. पुढे पालखी मंदिराच्या मैदानावर पोहचल्यानंतर मृदुंग आणि टाळ यांच्या गजरात वारकरी पावल्या, फुगडी खेळतात. त्या ठिकाणी मध्यभागी हंडी बांधलेली असते. सूर्य अस्तावेळी ही हंडी नाथ वंशजांच्या हस्ते फोडण्यात येते. यानंतर नाथ षष्ठी सोहळा समाप्त होतो.
हेही वाचा - Vinayak Raut Criticized Devendra Fadnavis : 'देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला'