औरंगाबाद - कोल्हापूर, सांगली भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर ओसरला असला तरी पूरग्रस्तांना आता मदतीची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या अभ्युदय फौंडेशनकडून पाच हजार कुटुंबीयांना जीवनावश्याक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे.
घर - संसार पाण्यात बुडल्याने पूरग्रस्तांना रोजच जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे अभ्युदय फौंडेशन आणि यशवंत प्रतिष्ठान औरंगाबादकडून औरंगाबादच्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचे आवाहन केले होते. या मदतीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पाच हजारांहून अधिक कुटुंबाना मदत मिळेल इतक्या वस्तू नागरिकांनी दिल्या. मिळालेले सर्व साहित्य एकत्र करून त्याचे वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार एका कुटुंबाला आवश्यक असेल तशा पद्धतीने त्याचे किट तयार करण्यात आले.
औरंगाबादकारांची दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी अभ्युदय फौंडेशनने पुढाकार घेतला. फाउंडेशनच्या सदस्यांनी जीवनावश्यक वस्तू किट असलेले दोन ट्रक कोल्हापूर सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी रवाना केले. साहित्य गरजूंपर्यंत पोहचवण्यासाठी फाउंडेशनचे जवळपास 50 सभासद पूरग्रस्त भागात मदतीसाठी दाखल झाले आहेत. मदत पाठवण्याची ही दुसरी फेरी असून जशी गरज लागेल त्या पद्धतीने वेगवेगळ्या स्वरूपात मदत पाठवणार असल्याचे अभ्युदय फौंडेशनचे निलेश राऊत यांनी सांगितले.