पैठण (औरंगाबाद) - लॉकडाऊन काळात पाचोड परिसरात बिनकामी फिरणाऱ्या दुचाकी तसेच चारचाकी वाहनावर कारवाई करणे सुरू होते. याच दरम्यान, पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पैठणचे नायब तहसीलदार संतोष अनर्थे यांच्यात शाब्दिक बाचाबाचीनंतर रस्त्यावरच हमरीतुमरी झाल्याचा गंभीर प्रकार १५ एप्रिलला दुपारी घडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार संतोष अनर्थे औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानुसार आपत्ति व्यवस्थापन कायदा २००५ नुसार पाचोड परिसरातील पर-राज्यातील कामगार व मजूरांची नोंदणी व त्यांच्या खाण्या पिण्याची व राहण्याची व्यवसथा व तपासणी करीता पाचोड येथे गेले होते. त्याच वेळी कर्तव्यावर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी नायब तहसीलदार संतोष अनर्थे यांची स्विफ्ट कार पाचोड येथील मोसंबी मार्केट जवळ अडवली. यावेळी नायब तहसीलदार संतोष अनर्थे यांच्या स्विफ्ट कारची नंबर प्लेट घासलेली होती. पाचोड पोलिसांनी मोटर कायदा कलमाखाली नायब तहसीलदार यांना पावती फाडावी लागेल, त्या शिवाय वाहन सोडणार नसल्याचे तंबी वजा फर्मावले. त्यामुळे संतोष अनार्थ यांनी आपली ओळख देत पैठण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आहे, असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शासकीय कामासाठी जात असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पाचोड पोलीस पावती फडल्याशिवाय वाहन सोडणार नसल्याच्या भूमिकेवर अडून बसले. ही बाब पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांना समजली. तत्काळ येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी संतोष अनर्थे यांच्याकडून मोटर वाहन कायद्यानुसार दोनशे रुपये दंड वसूल केला. विनाकारण पावती व अशोभनीय वर्तनावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच हमरातुमरी झाली. अतुल येरमे यांच्याविरोधात पैठण तालुका महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.