औरंगाबाद- जिल्ह्यात आज सकाळी कोरोनाचा आठवा मृत्यू झाला. मृत ४७ वर्षीय व्यक्ती हा गोरखेडा परिसरात रहात असून तो घाटी रुग्णालयात उपचार घेत होता. सध्या जिल्ह्यात १४५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे.
मृत ४७ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णास २७ एप्रिलला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा आज सकाळी ६.२० मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्यवसायाने वाहन चालक असलेल्या गुरू दत्तनगर येथील या रुग्णास ७ दिवसापासून ताप, कोरडा खोकला आणि ४ दिवसापासून श्वसनाचा त्रास होता. संबंधित लक्षणे कोरोना आजाराची दिसत असल्याने रुग्णास संशयित कोरोना कक्षात भरती करण्यात आले होते. तिथे रुग्णाच्या लाळेचे नमुने घेऊन चाचणीसाठी पाठविल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रुग्णाला कोरोना कक्षात हलविण्यात आले. तिथे त्याला कृत्रिम ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. रुग्णास कोरोना, न्यूमोनिआ, श्वसन विकार असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या १७७ वर पोहोचली आहे. काल पर्यंत कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर २४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यापैकी कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालय असलेल्या घाटी रुग्णालयात ११ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उर्वरित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा- 'विरोधकांच राजकारण राजभवनामधून, हे दुर्दैव'