छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : वाळूज भागातील घाणेगाव येथे जन्मदात्या आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाला मारहाण करीत, चटके दिल्याचा प्रकार उघड झालाय. त्याबाबतचा व्हिडीओ अज्ञाताने चाइल्ड हेल्पलाइनला पाठविला होता. यावरून चाइल्ड हेल्पलाइनच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पीडित मुलासह त्याच्या दोन भावांची घरातून सुटका केली. याबाबत मुलांशी संवाद करून पुढील निर्देश देईन अशी महिती महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड आशा शेरखाने-कटके यांनी दिली.
तीन मुलांची सुटका : वाळूज भागातील घानेगाव येथे एका लहान मुलाचा आई वडिलांनी छळ केल्याबाबत माहिती चाईल्ड हेल्पलाईनकडे आली. त्यानुसार पोलीस पोहचले असता, त्याठिकाणी 3 लहान मुलेच घरात कोंडून ठेवण्यात आली होती. त्यात अकरा वर्षांचा मोठा मुलगा, मधला आठ वर्षांचा मुलगा, 6 वर्षांचा मुलगा अशा तिघांना घरी ठेवून पालक बाहेरगावी गेल्याचे पोलिसांना घरमालकाकडून समजले. तिघांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची विचारपूस केली असता मुलांनी आमचे पप्पा दुसरेच असून, आई नेहमी लहान भावास उपाशी ठेवून मारहाण करते, पायाला चटके देते. त्याला आईने गरम तव्यावरही बसविले होते असे सांगितले. मुले बोलत असताना ती भुकेली असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना जेवण दिले.
प्रकरणी चौकशी सुरू : या प्रकरणात आता पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तिघा भावांची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना बालसुधारगृहात पाठविले आहे. महिला बाल कल्याण समितीने एक चौकशी समिती नेमली असून यातील अधिकारी मुलांशी संवाद साधणार आहेत. मुले सध्या घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनाचा विचार करून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. त्यानुसार पोलिसांना योग्य ते निर्देश देण्यात येतील अशी माहिती महिला बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड आशा शेरखाने - कटके यांनी दिली.