औरंगाबाद - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. दोन्ही नगरसेवकांनी आपआपल्या मागण्यांसाठी राजदंड पळवला. यावरून महापौरांनी एमआयएमच्या २० नगरसेवकांना एक दिवसासाठी निलंबीत केले आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना शहरातील अनियमित पाणी पुरवठ्यावरून भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी राजदंड पळवून महापौरांच्या आसनासमोर पाण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला होता. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन करण्याचा प्रस्ताव एमआयएमच्या नगरसेवकानी ठेवला. त्यावरून पुन्हा गोंधळ निर्माण झाला आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी राजदंड पळवला. यामुळे सुरुवातीला ६ तर नंतर १४ अशा एकूण २० नगरसवेकांना निलंबीत करण्यात आले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मान्य करीत नाही तोपर्यंत सभागृहातून हलणार नसल्याचा पवित्रा महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी घेतला. त्यानंतर पोलिसांनी महापालिका सभागृहातून सर्व निलंबीत नगरसेवकांना उचलून बाहेर काढले.
आता या नगरसेवकांचे सदस्यत्त्व कायमस्वरुपी रद्द करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे महापौरांनी सांगितले.