अमरावती- मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास शहरातील रंगोली लॉन जवळ घडली. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांची मंगळवारी गडगेनगर पोलीस ठाण्यासमोर गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता.
सौरभ राजेंद्र गवई (वय 27, रा. शेगावनाका) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी गजानन मोहोड (31), राजा मोहोड (34) आणि विजय मोहोड (32) या तीन आरोपी भावांना अटक केली आहे. शनिवारी सौरभचा राजा मोहोडसोबत पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. याबाबत राजाचे भाऊ गजानन आणि विजय यांना माहिती मिळताच त्यांनी सौरभला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. त्यानंतर सौरभवर तिन्ही भावांनी विटांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात जखमी झालेला सौरभ रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी पळ काढला. हा संपूर्ण प्रकार रस्त्यावरून जाणारे लोक पाहत होते.
घटनेची माहिती मिळताच गडगेनगर पोलीसांनी घटनास्थळ गाठून सौरभला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात मृत सौरभचे वाडील राजू गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध मोहीम राबवून तिन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, मंगळवारी शेगाव परिसरातील नागरिकांचा जमाव गडगेनगर पोलीस ठाण्यासमोर जमला होता. पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.