अमरावती - रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा पवित्र सण. बहुतेक मुस्लीम नागरिक या दिवशी कुटुंबासोबत राहून सण साजरा करतात. सध्या इर्विन रुग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी युनुस शाह रमजान ईदच्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते.
युनुस शाह हे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पब्लिक हेल्थ नर्सिंगमध्ये कार्यरत आहेत. कोरोना प्रतिबंध उपचार व उपाययोजनांना सुरुवात झाल्यापासून संशयित व रुग्णांची माहिती अद्ययावत करणे, प्रयोगशाळेतील अहवाल सांख्यिकी, विविध यंत्रणांत समन्वय आदी विविध कामे ते करतात.
त्यामुळे पहिल्या दिवसापासून युनुस हे कोव्हिड रुग्णालयातील रुग्णांच्या तपशीलाचे वर्गीकरण, प्रयोगशाळांच्या अहवालांचे वर्गीकरण, सांख्यिकी, विविध यंत्रणांशी समन्वय साधणे अशी नानाविध कामे आपल्या गत तीन महिन्यांपासून सुट्ट्यांच्या दिवसासह दररोज सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अविरतपणे करत आहेत.
कोरोना रुग्णांचा उपचार, अहवालांचे वर्गीकरण व त्यानुसार माहिती शासनाला, आयसीएमआरला कळविण्याची कार्यवाही अशी कामे अचूकपणे व विहीत वेळेत पूर्ण करावी लागतात. सतत नव्या माहितीची भर पडत असल्यामुळे ते अपडेट करताना खूप दक्षता घ्यावी लागते. कामाचा व्याप मनुष्यबळाच्या तुलनेत वाढला आहे. या काळात युनुसचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे.
युनुस हे मूळ चांदूर बाजार येथील आहे. ईद असल्यामुळे घरी थांबण्याचा त्यांचा कुटुंबाचा आग्रह होता. मात्र, सध्याच्या कामाची गरज पाहता कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य देऊन त्यांनी कामावर येणे पसंत केले व रात्री उशिरापर्यंत थांबून कार्यालयात सेवा दिली.