अमरावती - पावसाळा लागला की शेताच्या बांधावर विविध प्रकारच्या पौष्टीक रानभाज्या उगवत असतात. या रानभाज्या आरोग्यासाठी अति उत्तम असतात. सोबतच अनेक आजारांवर औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे महत्व दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. मात्र ग्रामीण भागापासून ते शहरा पर्यतच्या लोकांना रानभाज्याचे महत्व कळावे या हेतुने राज्यसरकार कडून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. अमरावती मधेही आज कृषी विभागाच्या वतीने भव्य रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तबल ५३ प्रकारच्या रानभाज्या या विक्रीसाठी आणल्या होत्या. या महोत्सवातही मेळघाटातील रानभाज्याचा डंका पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचे उट्घाटन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतुन रानभाज्याचा महोत्सव हा 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभरात राबवला जातो. त्याच पार्श्वभूमीवर या महोत्सवाचे आयोजन आज अमरावती जवळील वलगाव येथे करन्यात आले होते. यावेळी बोलताना मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की दिवसेंदिवस आपण रासायनिक कडे वळलो आहे. त्यामुळे नैसर्गिक आणि पौष्टीक रानभाज्या मागे पडत चालल्या आहे. परंतु आता या महोत्सवाच्या माध्यमातून मात्र लोकांना या रानभाज्याचे महत्व कळत आहे. प्रत्येकांनी पावसाळ्यात रानभाज्या या खाल्या पाहिजे, असेही मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
रानभाज्याच्या मार्केटिंग ला चालना देणार -
मेळघाटात मोठ्या प्रमाणावर रानभाज्या या उगवतं असतात. त्याची विक्री करण्यासाठी आम्ही प्रयत्न मध्ये आहोत. शासन सुद्धा विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करत आहे. तसेच मेळघाट हाट च्या माध्यमातून एमआयडीसी मध्ये सुद्धा या व्यवसायसाठी जागा देण्याचे नियोजन असल्याचे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
यशोमती ठाकुरांनी मारला रानभाजी व भाकरी वर ताव -
यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रानभाजी महोत्सवात फेरफटका मारला. यावेळी त्यांनी रानभाज्याची ओळख जाणून आदिवासी महिलांशी संवाद देखील साधला दरम्यान एका स्टॉलवर रानभाज्याची भाजी आणि भाकरी दिसतात यशोमती ठाकूर यांनी त्यावर ताव देखील मारला.