अमरावती - गेल्या अनेक दिवसांपासून शहरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीला राजापेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. तसेच या चोरट्यांकडून एकूण 49 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अनिल उर्फ सागर सदानंद वानखडे (वय 24,रा. सांगळुद तालुका दर्यापूर), निखिल दुर्योधन काळे (वय 25, रा.काटआमला, तालुका भातकुली) असे पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
दोन्ही दोघांनी शहरात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांसोबत आणखी काही साथीदार त्यांच्या या टोळीत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजापेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीत चोरी झाली होती. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज अनेक दिवसांपासून तपासण्यात येत होते. या फुटेजमध्ये अनिल वानखडे आणि निखिल काळे हे स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. शहरात राजापेठ पोलीस ठाण्यासह कोतवाली पोलीस ठाणे तसेच बडनेरा पोलीस ठाणे हद्दीत या चोरट्यांनी आजवर एकूण 50 च्यावर दुचाकी चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. या चोरट्यांनी आणखी कुठे कुठे धुमाकूळ घातला हे पोलीस चौकशीदरम्यान समोर येणार आहे.
हेही वाचा - बीडमध्ये एसटी बसची मोटार सायकलला धडक, दोन जण जागीच ठार
पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आणि पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनात राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात पोलीस कॉन्स्टेबल फिरोज खान, किशोर आंबुलकर यांनी पोलिसांनी कारवाई केली. तर दुचाकी चोरट्यांविरुद्ध अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.