अमरावती- देशातील विषारी सापांमध्ये सहाव्या क्रमांकावर असलेला पोवळा प्रजातीचा साप अमरावतीत जिल्ह्यात आढळला. अमरावती मधील तिवसा तालुक्यात येणाऱ्या गुरुकुंज मोझरी येथे आढळलेल्या या सापाची लांबी 12 इंच इतकी आहे. या सापाला सर्पमित्रांनी पकडून जीवदान दिले. तसेच या सापाची नोंद वनविभागाकडे करण्यात आली आहे.
गुरुकुंज मोझरीत आढळला दुर्मिळ साप
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी म्हणून देशभरात ओळख असणाऱ्या गुरुकुंज मोझरीत शुक्रवारी हा पोवळा जातीचा दुर्मिळ साप येथील श्री शेळके यांच्या घराच्या परिसरात आढळून आला. या सापाला उष्णता सहन होत नसल्याने हा साप थंड ठिकाणी जास्त करून आढळतो. त्यामुळे या ठिकाणच्या एका पाण्याच्या टाकीखाली आढळून आला. हा साप दिसताच नागरिकांकडून याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. अतिशय निराळेपणा सापात दिसल्याने काही जागरूक नागरिकांनी त्याला मारण्याऐवजी सर्पमित्रांशी संपर्क साधला. त्यावेळी सर्पमित्र मुकुंद जगदाळे, अवि ठाकरे, शुभम विघे, यांनी सापाचे प्राण वाचवून त्याची नोंद करण्यासाठी त्याला वनविभागच्या हाती सुपूर्द केले.
पोवळ्या सापाची लांबी 14 सेंटीमीटर पर्यंत राहते. त्याचा रंग तपकिरी असून डोके व मान काळी असते. तसेच शेपटीवर 2 काळे आडवे पट्टे ही या सापाची खास ओळख आहे. तसेच याप्रमाणे काळतोंड्या या बिनविषारी सापाचे फक्त डोके काळे असते असा फरक ही सर्प मित्रांनी यावेळी सांगितला. सापाच्या पोटाचा रंग लाल असतो, लांबट सडपातळ शरीर व त्याच्या मानेवर खवले असतात. या सापाला डिचवले तर हा शेपटी वर करून खवल्यांचा रंग लालसर करतो. हा साप मुख्यता जमिनीतील दगडाखाली किंवा वाढलेल्या पानाखाली राहतो. हा साप प्रामुख्याने महाराष्ट्र ,गुजरात ,पश्चिम बंगाल, तमिळनाडू व कर्नाटक या राज्यात आढळतो. या सापाची मादी वाळलेल्या पानाखाली किंवा दगडाच्या खाली राहते. या सापाची मादी एकावेळी दोन ते सात अंडी घालते अशी माहिती आहे.
हेही वाचा- अमरावती जिल्ह्यात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग