अमरावती - कोरोनामुळे तब्बल 10 महिन्यापासून शाळा बंद होत्या. तर आता कोरोना रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याने आता हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत. तर अमरावती जिल्हात पहिल्याच दिवशी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून आला. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यी व पालकांचेसुद्धा गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
पालकांनीही व्यक्त केला आनंद
10 महिन्यापासून विद्यार्थी घरी असल्याने व आजपासून शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य दिसत होते. त्यामुळे पालकांनीही आनंद व्यक्त केला. राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरू केल्या आहेत.
नियम-अटी पाळून शाळा सुरू
सुरवातीला 9वी ते 12वी व आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली जरी असली तरी कोरोनाचे सर्व नियम-अटी पाळून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून सर्व वर्गखोल्या, शाळा परिसरात जंतूनाशक फवारणी केली आहे. प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले. तर आज पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
मास्कचे वाटप
तिवसा येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक व कन्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्येही आज उत्साह पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या हस्ते फित कापून शाळा पूर्ववत सुरू झाली आहे. यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच स्वागतासाठी प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट करण्यात आली होती.