अमरावती - जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात एकही कोरोना रुग्ण संख्या नाही. मात्र, येथे डेंग्यू आजाराची साथ सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. गेल्या सहा दिवसात तिवसा नगरपंचायतच्या हद्दीत तिघांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. तर दीड महिन्यात तालुक्यात सहा जणांचा डेंग्यूने मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
- दीड महिन्यात तालुक्यात सहा जणांचा डेंग्यूने मृत्यू -
१९ ऑगस्ट रोजी तिवसा नगरपंचायतचे कर्मचारी सचिन देशमुख यांच्या १३ वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. कृष्णा सचिन देशमुख याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. डेंग्यूची लागण झाल्याने त्याला अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, सकाळी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. १४ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देवांश प्रमोद वाट (१८ वर्ष रा. तिवसा) हा अमरावतीच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. नातेवाईकांनी त्याचा मृतदेह पंजाबराव देशमुख रुग्णालयात देहदान करून एक आदर्श निर्माण केला. तर ८ ऑगस्ट रोजी शिक्षक कॉलनी येथील अजय विजय रेवतकर (वय ८ वर्ष) याचा देखील नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. तीन आठवड्यापूर्वी माधव नगर येथील भावना प्रकाश दौड (वय २५ वर्ष) या विवाहित महिलेचा देखील डेंग्यूने मृत्यू झाला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर आताही रुग्ण असून, येथे आता बेडही अपुरे पडत आहेत.
- शहरात स्वच्छता होत असल्याचा नगरपंचायतचा दावा -
तिवसा नगरपंचायतवर गेल्या ८ महिन्यापासून प्रशासन आहे. त्यामुळे या ठिकाणचा कारभार पूर्ण वाऱ्यावर आहे. या ठिकाणी दररोज स्वच्छता केली जाते व शहर नियमित स्वच्छ केलं जातं, असा दावा नगरपंचायतच्यावतीने करण्यात येतो. मात्र, महिन्याला आठ ते दहा लाख रुपये खर्च स्वच्छतेवर करूनही शहर घाणीच्या विळख्यात अडकले आहे. तर नियमितपणे फवारणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - भाजप-शिवसेनेतील मतभेद कोणत्याही क्षणी दूर होऊ शकतात - प्रवीण तोगडिया
- पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला होता आढावा -
मागील आठवड्यात पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी नगरपंचायतमध्ये आढावा बैठक घेत, मुख्याधिकारी पल्लवी सोटे यांना चांगलेच फटकारले होते. तर डेंग्यू रुग्ण का वाढत आहे? स्वच्छता का नाही? तसेच दुषित पाणी पुरवठा होतो त्याबद्दल नियोजन का नाही?असे प्रश्न विचारत, स्वच्छ पाणी पुरवठा करा असे मुख्याधिकारी सोटे यांना खडसावले होते. तरी देखील तिवस्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे शहर वाऱ्यावर असल्याचे या ठिकाणी चित्र आहे. त्यामुळे पुन्हा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी तातडीने यात लक्ष घालून एक आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
तिवसा, गुरुदेवनगर, मोझरी, सूरवाडी, शेंदूरजना बाजारसह इतर गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. अनेकांवर नागपुरात उपचार सुरू आहेत. तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण व मृत्यू देखील होत असल्याने प्रशासन मात्र सुस्त दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्याने या पाण्यातून डेंग्यूला आमंत्रण मिळत आहे.
- आंदोलनाचा इशारा -
दरम्यान, तिवसा शहरात वाढणाऱ्या डेंग्यू रुग्ण संख्येवरून राजकीय पक्षही आक्रमक झाले आहेत. तिवसाच्या नगरपंचायत विरोधात स्थानिक लढा संघटनेच्यावतीने एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते. तर काँग्रेसच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन लिहून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
डेंग्यूचा प्रसार कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडूनसुद्धा उपाययोजना राबवण्यासाठी आता सुरुवात झाली आहे. वीस तारखेपासून आरोग्य विभागाचे एक पथक तिवसा शहरात सर्वेक्षण करत आहे. ज्या लोकांच्या घरी नारळाच्या करवंट्या आणि टायरमध्ये पाणी आहे, त्या रिकाम्या करण्याचं आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच डेंग्यू टाळण्यासाठी स्वच्छता राखणं गरजेचे असल्याचे सध्या लोकांना सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - ती आली... तिने बघितले... ती उधळली... पुण्यात म्हैस उधळून दुचाकीवरील पती-पत्नी जखमी, घटना CCTVमध्ये कैद