अमरावती Sipana Patel Tree In Melghat : सातपुडा पर्वत रांगेत सागवानाच्या असंख्य झाडांनी वेढलेल्या मेळघाटात खंडू नदीच्या परिसरात घनदाट जंगलामध्ये सुमारे दीडशे वर्ष जुनं आणि सर्वात मोठा घेर असणारं सागवानचे झाड आहे. कोरकू भाषेत सागवानला 'सिपना' असं म्हणतात. कोरकू जमातीत आणि एकूणच मेळघाटात नामांकित किंवा प्रमुख असणाऱ्या व्यक्तीला 'पटेल' असं मानानं म्हटलं जाते. असाच मान या सागवान वृक्षाला देखील दिला जात असल्यामुळं हे झाड 'सिपना पटेल' या नावानं संपूर्ण मेळघाटात ओळखलं जाते. या 'सिपना पटेल'ला पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक गर्दी करतात.
'सिपना पटेल'ला पाहण्यासाठी येतात वृक्षप्रेमी : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात अतिशय दुर्गम भागात हतरु हे गाव वसलेलं आहे. या प्रमुख गावापासून आतमध्ये आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मारिता या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर खंडू नदी आहे. ही नदी ओलांडून सागवानच्या दाट जंगलामध्ये साडेतीन मीटर खोडाचा घेर असणारं सर्वात टूमदार सागवानचं झाड नजरेत भरते. हाच तो 'सिपना पटेल' आहे. हा सिपना पटेल कोरकू बांधवांसाठी जितका महत्त्वाचा आणि मानाचा आहे, तितकाच तो वृक्षप्रेमींसाठी अभ्यासाचा खास केंद्रबिंदू ठरला आहे. केवळ विदर्भातूनच नव्हे, तर त्याच्याबाबत माहिती असणारे, वृक्षांवर प्रेम करणारे अनेक वृक्षप्रेमी या घनदाट जंगलात 'सिपना पटेल'च्या भेटीला येतात.
आदिवासी बांधव करतात पूजा : मेळघाटातील आदिवासी बांधव हे निसर्गपूजक आहेत. आंबा, मोह, कदंब यासह सागवानाच्या झाडाची आदिवासी बांधव नियमित पूजा करतात. प्रत्येक गावालगत सागवानाच्या वनातील एका मोठ्या झाडाखाली देव ठेवलेले दिसतात. 'सिपना पटेल'च्या जवळ देखील लोखंडी त्रिशूलासह काही दगडांचे देव ठेवले आहेत. अतिशय मानाच्या असणाऱ्या 'सिपना पटेल'ची पूजा करण्यासाठी आदिवासी बांधव नियमित या ठिकाणी येतात. महापूजा जेवणाचे कार्यक्रम देखील आदिवासी बांधवांच्या वतीनं या परिसरात 'सिपना पटेल'च्या पूजेनिमित्त केले जातात.
असं आहे सागवानचे वैशिष्ट्य : सागवान हे मुळात भारत, म्यानमार आणि थायलंडचे वृक्ष आहेत. भारताच्या उत्तरेकडं सागाचं वन मोठ्या प्रमाणात आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आणि उष्णकटिबंधीय हवामान हे सागवान वाढीसाठी उपयुक्त ठरते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटाच्या जंगलात लाखोच्या संख्येत सागवान जंगल पसरलं आहे. सागवानची फुलं जुलैमध्ये उमलण्यास सुरुवात होते आणि सप्टेंबरपर्यंत ती फुलतात. या झाडाला गोलाकार फळं येतात. सागाचं झाड दिसायला अतिशय सुंदर असून सागवानाला व्यापारी मूल्य देखील फार आहे. या झाडाची साल तपकिरी रंगाची आणि कधी गडद सोनेरी दिसते. उन्हाळ्यात या झाडाच्या पानांची गळती होते. हे झाड सरळ वाढते आणि उंच वाढल्यावर त्याच्या फांद्या मुकुटासारख्या पसरतात.
फर्निचरसाठी उपयुक्त आहे सागवान : सागवानचे लाकूड हे अतिशय मजबूत आणि टिकाऊ लाकूड म्हणून ओळखलं जाते. सागवानच्या लाकडाची किंमत देखील सोन्यासारखीच मौल्यवान आहे. भारतात अनेक जुन्या इमारती सागवान लाकडामुळं हजारो वर्षांपासून टिकून आहेत. मेळघाटात आदिवासींच्या प्रत्येक घराला सागवान लागलं आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी सागवानचं महत्व देवा पेक्षा कमी नाही. यामुळेच सर्वात मोठा आणि मानाचा असणाऱया 'सिपना पटेल'चं पुढील हजारो वर्ष जतन करण्यासाठी आदिवासी बांधव प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा :