अमरावती- गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वाट्याला परिवाहन खाते आले होते. यामुळे राज्यभरात शिवशाही बससेवा सुरु करण्यात आली होती. यामध्ये खासगी कंत्राटदारांच्या बसही आहेत. या शिवशाही बस सेवेबद्दल अनेकदा तक्रारी येत होत्या. यातच शनिवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुण्याहून अमरावतीला निघालेल्या प्रवाशांना रस्त्यातच उतरावे लागले आहे.
पुण्याहून अमरावतीकडे २२ प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस एका फायनान्स कंपनीने थकबाकीमुळे बोरगाव मंजूजवळ जप्त केली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागले. यानंतर एसटी महामंडळाला त्या प्रवाशांना अमरावतीला आणण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागली.
पुण्याहून एमएच २९ बी १०१९ या क्रमांकाची शिवशाही बस सायंकाळी ७ वाजता २२ प्रवासी घेऊन अमरावतीकडे निघाली होती. शिवशाही बस या महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात जरी चालत असल्या तरी, त्या खासगी आहेत. खासगी कंपन्यांकडून या बस चालविल्या जातात. संबंधित कंपनीने शिवशाही बस ही फायनान्सवर खरेदी केली होती. तिचे हप्ते थकीत असल्यामुळे कंपनीने जप्तीची कारवाई केली. बोरगाव मंजू बस स्थानकावर सकाळी ७ वाजता फायनान्स कंपनीचे कर्मचारी शिवशाही बसच्या आडवे होऊन चालक पोहोकारकडून त्यांनी बस ताब्यात घेतली. यामुळे बसमधून प्रवाशांसह चालक व वाहकाला उतरावे लागले.