अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मेळघाटात होळी उत्सव साजरा करीत असल्याचा निषेध शिवसेनेने नोंदविला आहे. राणा दाम्पत्याने हरिसाल येथे होळीला चपलांचा हार घालून हिंदूंचा अवमान केल्याचा आरोप करीत राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार चढवला.
होळीला चपला हार घातल्याचा निषेध -
हिंदू धर्मात फुलांचा आणि शेणाच्या गौऱ्यांचा हार घालून होळी पेटविण्याची परंपरा आहे. होळीच्या सणाला हरिसाल येथे खासदार नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात दोषी असणाऱ्या विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी या वन अधिकाऱ्यांच्या फोटोला चपलांचा हार घातला. हा प्रकार गंभीर असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कृत्य धार्मिक भावना भडकविणारे असल्याने या दोघांवरही गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
आंदोलनात यांचा सहभाग -
राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार घालण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, महिला आघाडीच्या मनीषा टेंम्बरे, वर्षा भोयर, कांचान ठाकूर आदी सहभागी होते.
हेही वाचा - दीपाली चव्हाणचे आणखी एका पत्र आले समोर, प्रकरणात आला नवा ट्विस्ट