अमरावती- 'जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल' असा जयघोष करीत रुक्मिणीचे माहेर असणाऱ्या कौडण्यापूर येथून आज रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला निघाली. आषाढी एकादशीला ही पालखी पंढरपूरला पोहोचणार असून आज(रविवारी)सायंकाळी येथील बियाणी चौकात या पालखीचे आगमन होताच शेकडो अमरावतीकर भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. कौडण्यापूर येथून पंढरपूरला पालखी जाण्याची परंपरा ४२४ वर्षांपासून जोपासली जात आहे.
१५९४ सालापासून कौडण्यापूर येथून रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला जाते. आमदार यशोमती ठाकूर या अनेक वर्षांपासून बियाणी चौक येथे पालखीच्या स्वागताचे आयोजन करतात. आज पालखी येण्यापूर्वी बियाणी चौकात येणारी वाहतूक तासभर आधीपासून इतर मार्गाने वळविण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी जमलेल्या महिला भविकांसोबत आमदार यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा ताल धरला.
रुक्मिणी मातेच्या पालखीचे बियाणी चौकात आगमन होताच आमदार यशोमती ठाकूर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांनी पालखीला खांदा दिला आणि पालखी चौकात सजविलेल्या स्टेजवर आणली. यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पालखीचे पूजन आणि आरती करण्यात आली.
पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडणे, माजी महापौर विलास इंगोले, अॅड. सुनील देशमुख यांच्यासह शेकडो भाविकांनी पालखीचे पूजन करून दर्शन केले. रुख्मिणी माता माहेरातून सासरी जात आहेत. या प्रसंगी आम्ही आपल्या जिल्ह्यातला दुष्काळ संपुष्ट येवो आणि बळीराजा सुखी व्हावा अशी प्रार्थना करतो, असे आमदार यशोमती ठाकूर पत्रकारांशी बोलताना म्हणल्या.