अमरावती - कोरोनाबाबत तपासणी दर आणि उपचार दर निश्चित करून देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्यादा दर आकारून रुग्णांची अडवणूक करणाऱ्या रुग्णालांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजेश टोपे शुक्रवारी(26सप्टेंबर) अमरावतीत आले होते. बचत भवन येथे आढावा बैठक घेतल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
जिल्ह्याचा मृत्यू दर 2.11 टक्के आहे. तो एक टक्क्यावर यावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 30 टक्के आहे. तो 10 टक्क्यांहून कमी व्हायला हवा. त्यासाठी तपासणी संख्या एक हजारापर्यंत वाढवणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.
लवकरच प्लाझ्मा सुविधेसह 100 बेड्सची सोय
प्लाझ्माची सुविधा सुरू करण्यात आली असताना त्याचा सक्सेस रेटही तपासायला हवा. खाटांची उपलब्धता व इतर सुविधांसाठी विळोवेळची माहिती अचूक देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे डॅशबोर्ड असावा. लिक्विड ऑक्सिजनबाबत भिलाई येथून एक आणखी टँकर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाबधितांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या वाढावी यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात 100 खाटा उपलब्ध होऊ शकतात. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तपासणी व उपचार दर निश्चित करण्यात आले आहेत. अमरावतीत रुगणांना दाखल करून घेताना कोणाताही डॉक्टर आगाऊ रक्कम घेत असेल तर याची माहिती नागरिकांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी अशा डॉक्टवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपस्थित होते.