अमरावती - देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. जिल्ह्यात पोलिसांची गस्त वाढली असतानाच अमरावती जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त केली. या दोन्ही घटना पाहता जिल्ह्यात सर्रास अवैध दारू विक्री होत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.
जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद पोलीस स्टेशनला लागूनच सात ते आठ किलोमिटरवर मध्यप्रदेशची सीमा लागून आहे. या सीमेवरून जरूड, बेनोडा, लोणी आणि वरूड येथे मोठ्या प्रमाणात गावठी दारू अवैधरीत्या विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी २९ ला सायंकाळी साडेआठच्या सुमारास जामगांव येथील तलोठी येथे ४०० लीटर अवैध गावठी मोहाची दारू जप्त केली आहे. दुसरी घटना तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमधेही देशी दारूच्या पावट्या आणणाऱ्या दारूविक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिपक शामराव मोरे (वय ३२ रा. आठवडी बाजार जरूड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शुक्रवारी जामगांव खडक्याला लागूनच असलेल्या तलोठी येथे ओमिनीतून (क्रं. एम. एच. १७ टी. १२४५) ८ रबरी ट्युब प्रत्येकी ५० लीटर असे एकून ४०० लीटर गावठी हातभट्टीची दारू किमंत ४० हजार रूपयाचा माल पोलिसांनी जप्त केला.
यातील दारू तपासणीसाठी पाठविली असून उर्वरीत दारू जागीच नष्ट करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी २ लाख ५० हजार रूपये किमतीची मारुती व्हॅनसह ४० हजार रूपयाची गावठी दारू असे एकूण २ लाख ९० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. याप्रकरणी आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील पाटील यांच्यासह दिपक काळे, संजय गोरे, अंकेश वानखडे, चालक संतोष माहुरे करीत आहे.