अमरावती - सिने तारका कंगना राणौतच्या मुंबई येथील मालमत्तेवर महापालिकेने कारवाई केल्यानंतर राज्यातील परिस्थिती बिकट असल्याचा निर्वाळा खासदार नवनीत राणा यांनी दिला होता. यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, अशी मागणी त्यांनी केली होती. तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती. दोन दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यावर उत्तरप्रदेश पोलिसांनी तिचा मृतदेह परस्पर जाळून टाकल्याची निर्दयी घटना घडली. यानंतर खासदार नवनीत राणा गप्प का? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट नको का, असा सवाल त्यांच्या विरोधकांनीही उपस्थित केलाय.
उत्तरप्रदेशात योगी सरकारच्या कार्यकाळात युवतीसोबत क्रूर घटना घडली. प्रचंड चीड निर्माण करणाऱ्या या घटनेबाबत आमच्या खासदार आता गप्पा आहेत का आहेत, अशी विचारणा अमरावती जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख वर्षा भोयर यांनी केली. कंगना प्रकरणानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणाऱ्या नवनीत राणा आता उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार का असे ही त्या म्हणाल्या. भाजपकडून पदांची अपेक्षा ठेऊन खासदार नवनीत राणा यांनी भूमिका घेणे योग्य नाही, असे भोयर यांनी स्पष्ट केले.
कंगना राणौतच्या घरची साधी भिंत पडली तर खासदार नवनीत राणा यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असे वाटत होते. उत्तरप्रदेशात आता आपल्या एका बहिणीवर बलात्कार होतो, रातोरात तिचा मृदेह जाळून टाकण्यात येतो, या हुकूमशाहीबाबत आपल्या खासदारांनी बोलायला पाहिजे, अशी मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निलेश गुहे यांनी केली.
शिवसेना, काँग्रेस या पक्षातील अनेकांकडून खासदार नवनीत राणा यांना या विषयावर प्रश्न विचारले जात असताना सोशल मीडियावरही त्या ट्रोल होत आहेत.