अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील दोन कर्मचारी कामाच्या वेळेत इंटरनेटवर सिनेमा पाहण्यात व्यग्र असल्याचा आरोप विद्यार्थी संघटना 'एनएसयुआय'ने केला आहे. याबाबत पुरावा म्हणून विद्यार्थी संघटनेने कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना व्हिडिओ क्लिप सादर करीत जुगार खेळायचे पत्तेही भेट दिले आहेत.
एनएसयुआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव समीर जवंजाळ यांच्या नेतृत्वात एनएसयुआयचे कार्यकर्ते आणि काही विद्यार्थी विद्यापीठात धडकले. यावेळी कुलगुरूंना एका बैठकीत जायचे असल्याने कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी अगदी थोडक्यात विषय मांडा असे सांगितले. अनेक महाविद्यालयात प्रवेशाबाबत येणाऱ्या अडचणींबाबत विद्यार्थ्यांनी कुलगुरूंकडे तक्रारी मांडल्या आहेत. समीर जवंजाळ यांनी विद्यापीठात यापूर्वी कर्मचारी अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचा आरोप केले. पण, तेव्हा त्यांच्याकडे पुरावे नव्हते.
आवक-जावक शाखेतील एक कर्मचारी कामाच्या वेळेत त्याच्या मोबाईलमध्ये सिनेमा पाहत होता. दुसरा कर्मचारी विद्यापीठाच्या संगणकावर सिनेमा पाहत होता. या दोन्ही कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ असल्याचे जवंजाळ यांनी कुलगुरुंना सांगितले. यावेळी दालनात आलेले कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आणि कुलगुरू दोघांनीही हा व्हिडिओ पहिला.
एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही कर्मचऱ्याना निलंबित करण्याची मागणी केली. कुलगुरूंना चौकशी करून कारवाई असे आश्वासन दिले. यावेळी समीर जवंजाळ यांनी विद्यपीठातील कर्मचाऱ्यांसाठी टाईमपास करायला पत्त्यांचा कॅट भेट कुलगुरूंसमोर पत्ते फेकले. या सर्व प्रकारामुळे काहीसा गोंधळ उडाला. यावेळी एनएसयुआयचे सागर कालाने, योगेश बुंदीले, चैत्यन्य पाटील, शंतनू भालेराव व अमोल इंगळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.