अमरावती - खासदार नवनीत राणा यांनी इर्विन अर्थात जिल्हा सामान्य रुग्णालयाचा दौरा केला. यावेळी लहान मुलांच्या वॉर्डाची झालेली दुरवस्था आणि आऊटडेटेड औषधी पाहून त्या थक्क झाल्या.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान बाळांच्या वॉर्डमध्ये खासदार नवनीत राणा यांनी आजारी बाळांची पाहणी केली. त्यानंतर त्यांना येथील शौचालयाची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली. खासदार शौचालयाची पाहणी करणार हे कळताच डॉक्टरांनी धावपळ करीत शौचालयात पाणी ओतले. मात्र, शौचालयाची पाहणी केल्यावर खासदार नवनीत राणा चकित झाल्या. प्रचंड दुर्गंध आणि अस्वच्छता पाहून त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना चांगलेच खडसावले. यानंतर त्यांनी बाळांच्या वॉर्डात औषधी तपासल्या असता आऊटडेटेड औषधी आढळून आल्या. त्यामुळे त्यांनी संबंधित डॉक्टरांची चांगलीच खरडपट्टी काढली.
तुमच्या मुलांना, बायकोला अशा शौचालयात पाठवल का ? असा सवाल करून त्यांनी डॉक्टरांना चांगलेच खडसावले. तसेच मी दर आठवड्याला जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करणार. रुग्णाच्या आयुष्याशी खेळणे बंद करा, असा समज खासदार राणा यांनी यावेळी डॉक्टरांना दिला.