अमरावती - शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतोरा गावानजीकच्या एका नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात वारंवार पूर येऊन शेकडो हेक्टरवरील शेतीचे नुकसान होत आहे. मंगळवारी (दि. 30 जून) रात्री आलेल्या पावसामुळे दुबार पेरणी केलेले बियाणे या नाल्याच्या पुरामुळे खरडून गेले त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेकडो शेतकऱ्यांवर तीबार पेरणीचे संकट येणार आहे. दरम्यान, या नुकसग्रस्त शेतकऱ्यांची आपली कैफियत ईटीव्ही भारतने बातमीच्या माध्यमातून मांडल्यानंतर त्या बातमीची दखल घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या नुकसानग्रस्त शेत जमिनीची पाहणी केली. लवकरात लवकर याचा पाठपुरावा करून या नाल्याचे खोलीकरण करून शेतकऱ्यांची समस्या सोडवणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. सोबतच या गावातील दोन गावांना जोडणार पूल आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या पुलाचीही पाहणी खासदार राणा यांनी केली.
या नाल्याच्या बांधकामासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सामुहिक आत्महत्येचा इशारा दिला होता. दरम्यान, या शेतकऱ्यांनी आपली कैफियत 'ईटीवी भारत'समोर मांडताच याची दखल घेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आज (दि. 2 जुलै) त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाल्या, मागील अनेक वर्षांपासून या लोकांची समस्या आहे. पण, कुठलाच लोकप्रतिनिधी ही समस्या सोडवू शकले नाही. दरवर्षी या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे पाचशे एकरवर शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्याचे पंचनामे केले जातात. पण, शेतकर्यांना मदत मिळत नसल्याचे राणा म्हणाल्या. पुढे या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बातमीची घेतली खासदारांनी दखल - तिबार पेरणीचं संकट..! अमरावतीच्या अंतोरा गावातील शेतकऱ्यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा..