अमरावती - परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ मदत द्या. मुख्यमंत्रीसाहेब आता तरी घराबाहेर पडा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती बघा, असा सल्ला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. पावसामुळे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकडो सोयाबीन पोते हे पावसात भिजले होते. त्याची पाहणी करण्यासाठी खासदार राणा या बाजार समितीत आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. बाजार समितीत शेड अभावी शेतकऱ्यांचा माल पाण्यात भिजत आहे. हवामान खात्याने पाण्याचा अंदाज वर्तविल्यावर सोयाबीन लवकर खरेदी करणे गरजेचे होते. पण, तसे झाले नाही त्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे खासदार राणा म्हणाल्या.
हेही वाचा - अनलॉक ५: महाराष्ट्र एक्सप्रेसचा चांदूर रेल्वे स्टेशनवरील थांबा रद्द, रेल रोको समिती आक्रमक