अमरावती - हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेनंतर मेळघाटातील 'रेड्डी राज'चे काळे वास्तव समोर येत आहे. खासदार नवनीत राणा यांनी तर रेड्डीची मेळघाटात पैसे खाऊ टीम असल्याचा आरोप केला आहे. उपवनसंरक्षक शिवकुमार हा अपर प्रधान उपवन संरक्षक असणाऱ्या श्रीनिवास रेड्डींच्या या पैसे खाणाऱ्या टीमचा एक सदस्य होता, असे नवनीत राणा म्हणाल्या.
मागील वर्षी होळीला झाली होती दीपाली चव्हाणची भेट -
दरवर्षीप्रमाणे होळीनिमित्त आम्ही मेळघाट गेलो होतो. त्यावेळी हरीसाल येथे पाहिल्यांदाच दीपाली चव्हाण मला भेटल्या होत्या. त्यावेळी महिला अधिकारी म्हणून काही अडचणी आहेत का? हे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र, सध्या मी काहीच बोलत नाही, तुमच्या घरी येऊन मला काय त्रास होतो ते सांगेल, असे दीपाली चव्हाण म्हणल्या असल्याचे राणा यांनी सांगितले.
रेड्डीकडे केली होती दीपाली चव्हाण यांच्या बदलीची विनंती -
होळीनंतर दीपाली चव्हाण या पतीसह आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी शिवकुमारकडून होणाऱ्या छळाची माहिती दिली होती. शिवकुमार आणि त्यांच्या संवादाचा ऑडिओ पण ऐकवला होता. त्याच्या वेदना जाणून घेतल्यानंतर अपर प्रधान उपवन संरक्षक असणाऱ्या श्रीनिवास रेड्डी याला फोन करून दीपालींची बदली मेळघाटाबाहेर चांदूरबाजार किंवा वडाळी या ठिकाणी करण्याची मी चारवेळा विनंती केली होती. आमदार रवी राणा यांनी देखील तत्कालीन वनमंत्री राठोड यांच्या सोबत दीपाली चव्हाण यांच्या बदलीबाबत बोलणे केले होते, असे नवनीत राणा म्हणाल्या.
शिवकुमारला रेड्डीची साथ -
वारंवार रेड्डीला दीपाली चव्हाणवर होणाऱ्या अन्यायबाबत सांगितले होते. तिच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याची तक्रार केली होती. मात्र, रेड्डी नेहमी शिवकुमारची बाजू घ्यायचे, असेही राणा यांनी सांगितले. आपल्या जिल्ह्यात ज्या महिलांवर अत्याचार होतो अशा अनेक पीडित महिला माझ्या दारी येतात. जिल्ह्याची खासदार म्हणून या महिलांच्या व्यथा जाणून घेणे आणि त्याचे निवारण करणे, हे मी माझे कर्तव्य समजते. दीपालीची व्यथा मी ऐकली होती. जर अशी व्यथा ऐकणे गुन्हा असेल तर मी तो केला आहे, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
आता अधिकाऱ्यांसोबत वागायचे कसे हे जनतेनेचं सांगावे -
आयपीएस, आयएस पदावर जाणारी व्यक्ती ही शिक्षण घेऊन मोठी झालेली असते. यामध्ये कोणी साऊथचा नसतो ना कुणी नॉर्थचा. त्यांच्या लॉबीबाबत मी काहीच बोलत नाही. मात्र, जे लोक महिलांवर अन्याय करतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. अनेकदा अशा अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींनी मारले तर ते वाईट ठरतात आणि नाही मारले तरी वाईटच ठरतात. आता अशा अधिकाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय भूमिका घ्यावी हे जनतेनेच आम्हला सांगावे, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी केले.
हेही वाचा - 'मनीषा उईके तिच्या आयुष्यात कधीच सुखी नाही होणार!' दीपाली चव्हाण प्रकरणात नवीन ट्विस्ट