अमरावती - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ मातोश्रीमध्ये राहून फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद न साधता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे दुःख जाणून घ्यावे, असा सल्ला अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी या मागणीसाठी पावसामुळे खराब झालेले सोयाबीन रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाळले आणि महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.
आम्ही मागील सहा दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील ग्रामिण भागाचा दौरा केला. यात परतीच्या पावसामुळे शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसले. विदर्भातील शेतकऱ्यांचा कोणी माय-बाप राहला नाही. या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी सोयाबीन पेटवल्याचे रवी राणा यांनी यावेळी सांगितलं. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले असून विदर्भासह अमरावतीमध्ये परतीचा पाऊस आल्याने सोयाबीन सहित अनेक पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.
सोयाबीनची कापणी पूर्ण झाली आणि परतीच्या पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी अडचतीत सापडला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले सोयाबीन मातीमोल झाले. तर त्यातून काढलेले काही सोयाबीन हे काळे पडले आहे. आता या सोयाबीनला मातीमोल भावात विकावा लागल्याने शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आमदार रवी राणा यांनी सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन सोयाबीन भेट दिले व जिल्हाधिकारी परिसरात सोयाबीन जाळून शासनाचा निषेध व्यक्त केला. शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना भरघोस मदत देण्याची मागणी देखील रवी राणा यांनी यावेळी केली आहे.