अमरावती - निवडणुकीच्या दिवसापर्यंत सगळ्यांनी मेहनत घ्यावी. नवनीत राणा खासदार म्हणून निवडून आल्यावर जिल्ह्याचा विकास आणि युवकांना रोजगार यावर भर देतील. प्रकाश आंबेडकर यांचाही नवनीत राणांना आशीर्वाद आहे. यामुळेच ते अमरावतीत वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत काही बोलले नाही, असे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे.
राणांना काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या प्रचारार्थ आज युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेगाव नाका परिसरातील अभियंता भवनात मेळावा आयोजित केला होता. यावेळी राणा बोलत होते. मेळाव्यासाठी अमरावतीचे माजी आमदार रावसाहेब शेखावत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, अमरावती महापालिकेचे विरोधी पक्ष नेते बबलू शेखावत, ऑटो युनियनचे अध्यक्ष नितीन मोहोड उपस्थित होते.
देशात राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी अमरावती जिल्हा युवक काँग्रेसने युवा स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे. आज अभियंता भवन येथे आयोजित सभेत युवक काँग्रेसने राणा यांच्यासाठी येणारे १५ दिवस कठोर मेहनत घेण्याचा निश्चय केला आहे. यावेळी जिल्ह्याबाहेरचे पार्सल या निवडणुकीत जिल्ह्याबाहेर पाठविण्यासाठी युवक काँग्रेसने मेहनत घ्यायची आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचीही जबाबदारी सगळ्यांची आहे, असे शेखावत म्हणाले.