अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वडील स्वर्गीय भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंती निमित्त मुलगा यशवर्धन व मुलगी आकांशा समवेत अमरावतीच्या तिवसा शासकीय ग्रामीण रुग्णालयात रक्तदान केले. याद्वारे ठाकूर यांनी आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनेही स्वतः पुढे येऊन रक्तदान चळवळ वाढविण्याचे आवाहनही मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.
हेही वाचा - अपुऱ्या प्राध्यापकांच्या भरवशावर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा डोलारा; अमरावती विद्यापीठात गंभीर स्थिती
150 पेक्षा जास्त तरुणांचे रक्तदान
गेल्या ९ वर्षापासून माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमरावतीच्या तिवसा येथे सचिन गोरे मित्र परिवार व यशोमती ठाकूर मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन केले जाते. यंदाही भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंती निमित्ताने 150 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी वडिलांच्या जयंती निमित्त पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह त्यांची मुलगी आकांक्षा व मुलगा यशवर्धन यानेही रक्तदान केले. गेल्या अनेक वर्षांपासून वडिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबीराचे आयोजन करत असतो. आता वडिलांच्या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करतो, असे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
रक्ताच्या नात्यातून आम्ही प्रेमाचे नाते वाढवतो
दरवर्षी रक्तदानाला प्रतिसाद वाढतो आहे. मागील वर्षापासून आम्ही कुटुंबासह रक्तदान करतो. रक्ताच्या नात्यातून आम्ही प्रेमाचे नाते वाढवतो. कोरोनाची लस आल्यामुळे ही लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. रक्तदान आपण केले पाहिजे. रक्ताचा साठा हा गरजूंना महत्वाचा आहे. मी वयाच्या आठराव्या वर्षापासून रक्तदान करत आहे. सर्वानी रक्तदान करावे, असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी केले.
हेही वाचा - 'राज्य सरकारने 50 कोटी दिले तर 2022ला विमानतळ सुरू होणे शक्य'