अमरावती - सरकारने लॉकडाऊन दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली. यानंतर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजुरांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन केले गेले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये आणि तो नियंत्रणात आणावा यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यावेळी नागपुर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी परराज्यातून आलेले मोठ्या प्रमाणात रोजंदारीवर काम करणारे मजूर चांदूर रेल्वे तालुक्यात अडकले आहेत. आता सरकारकडून गावी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी मजुरांची धावपळ सुरु झाली आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट होण्यासाठी शासकीय दवाखान्याचे किंवा एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी मजुरांनी घुईखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर लांबच लांब रांग लावल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - लॉकडाऊनदरम्यान तब्बल 20 लाखांचा गुटखा जप्त, शिरखेड पोलिसांची कारवाई