अमरावती - यावर्षी पावसाळा कमी झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत आहे. काही गावात मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्याने या गावात पाणी मिळावे, या उद्देशाने काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वीच अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. दरम्यान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने रविवारी रात्री १२ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतच्या सूचना नदीकाठच्या गावांना दिलेल्या आहे.
यावर्षी पावसाळा कमी झाल्याने व पाण्याची पातळी खाली गेल्याने अनेक गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. शेतीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, त्यामुळे गुराढोरांना सुद्धा पिण्याचे पाणी नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अप्पर वर्धा धरणाला पाणी सोडण्यात येणार असल्याने मोर्शी, तिवसा व धामनगाव रेल्वे या तालुक्याला याचा फायदा होणार आहे.
विदर्भातील सर्वात मोठे असलेले अप्पर वर्धा धरण आजघडीला १६.७९ टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी ३७.९७ टक्के पाणी होते. याच धरणावर अनेक गावातील नागरिकांचे जीवन अवलंबून आहेत. आज रात्री १२ वाजता या धरणांमधून नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. या धरणांमध्ये पाणीसाठा अत्यल्प असल्याने कमी प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणातून सोडलेले पाणी किती गावाला मिळणार व या पाण्याचा उपयोग गावकरी कसे करणार? हा प्रश्न उदभवलेला आहे.
आज रात्री १२ वाजता धरणातून पाण्याचा नदीद्वारे विसर्ग केला जाणार आहे. अशी माहिती अधिकाऱयांनी दिली असून प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यास एक महिन्याचा अवधी असून एक महिना उष्णतामान राहणार आहे त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सुद्धा होणार आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठा, धरणातील गाळ व पाण्याचे होणारे बाष्पीभवन पाहता धरणामध्ये असलेले पाणी नियोजन पूर्ण वापरणे गरजेचे असल्याचे मत नागरिक मांडत आहेत.