अमरावती : श्रावण महिन्यात शेतीची कामे आटोपल्यावर पहिलाच सण हा नागपंचमीचा साजरा केला जातो. या सणाला शेतकऱ्यांचा मित्र, अशी ओळख असणाऱ्या नागाची पूजा केली जाते. मेळघाटातील आदिवासी बहुल भागात नागराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. येथील आदिवासी शेतकरी नागपंचमीला आपल्या शेतात कोंबडा कापून हा सण साजरा करतात.
असा आहे पूजेचा संपूर्ण विधी : नागपंचमीच्या दिवशी भाजीपाल्यासह कुठलीही वस्तू कापणे हे अशुभ मानले जाते. बहुतेकजण या रुढीचे पालन करतात. मात्र मेळघाटातील 'कोरकू' या आदिवासी जमातीमध्ये नागपंचमीच्या दिवशी कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आहे. ही जमात शेतीचे रक्षण करणाऱ्या 'जमीन का बाबा' अर्थात नागाला खूप मानते. नाग हा आपल्या शेतीचे रक्षण करतो. पिकांचे नुकसान करणाऱ्या प्राण्यांना खाऊन शेतकऱ्यांना मदत करतो. तो सदैव फणा काढून शेतात रक्षणासाठी उपस्थित असतो. त्यामुळे नाग देवता ही अन्नदेवता असून या नाग देवाची कृपा आपल्यावर सदैव राहावी. शेतात भरभरून पीक यावे, यासाठी नागपंचमीला कोंबडा कापून नाग बाबाला प्रसन्न केले जाते, अशी माहिती चिखलदरा तालुक्यातील जांभलीवन गावाच्या रहिवासी राणू भुसूम ह्यांनी नी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
या जमातीच्या लोकांच्या शेतात महादेवाची पिंड असते. त्या पिंडाजवळ नाग आणि त्रिशूळ असतो. जमातीमधील शेतकरी आपल्या कुटुंबासह नागपंचमीच्या दिवशी शेतात येतात. कोंबड्याची पूजा करतात. महादेवाच्या पिंडीसमोर दोन नारळ फोडतात. रव्याचा शिरा प्रसाद म्हणून तयार करतात. तसेच गव्हाच्या पिठाचा मलिदा प्रसाद नाग बाबाला अर्पण केला जातो. पूजा विधी पार पडल्यावर कोंबड्याला कापून संपूर्ण कुटुंब शेतात सोबत बसून मांसाहाराचे सेवन करतात. - राणू भुसूम, आदिवासी
नदीच्या काठावरही केली जाते पूजा : ज्या आदिवासी कुटुंबाकडे स्वतःचे शेत नाही किंवा शेतात वारुळ नाही. तसेच महादेवाची पिंड नाही. असे आदिवासी कुटुंब नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठी हा सण साजरा करतात. नाग देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबड्याचा बळी दिलाच गेला पाहिजे, असा आमचा नियम असल्याचे राणू भुसूम म्हणतात. चुरणी, काटकुंभ परिसरातदेखील ही प्रथा पाळली जाते. मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यातील आदिवासी बांधव नागपंचमीला कोंबड्याची पूजा करुन त्याचा बळी देतात. चुरणी, काटकुंभ, डोमा, खंबला काजलडोह या भागातील आदिवासी जमाती वारुळा जवळ नारळ फोडतात. फुले हार वाहून नाग देवतेची पूजा करतात.
तव्याचा वापर होत नाही : नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकासाठी कोणी तव्याचा वापर करत नाहीत. तव्याचा वापर होत नसल्यामुळे पोळ्यांऐवजी कढईत तेलामध्ये पुऱ्याच तळल्या जातात. मेळघाटात नागपंचमीला कोंबडा कापण्याची प्रथा असली तरी या भागातील आदिवासी बांधवही नागपंचमीला चुलीवर तवा ठेवत नाहीत.
हेही वाचा-