अमरावती - लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला दारू विक्रीवर बंदी होती. पण आता दारूविक्री सुरू करण्यात आली आहे. ही दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाईन शॉप व देशी दारू विक्रीकरता परवानगी देण्यात आली. अशात आता दुसऱ्या गावातून दारू आणून खेड्यापाड्यात विकण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता भाजीपाल्याच्या नावाखाली गाडीतून दारुची तस्करी करणाऱ्यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
शहरात एका व्हॅनमध्ये वॉईन शॉपमधून मोठ्या प्रमाणात दारू आणली जात असल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस त्याठिकाणी गेले असता व्हॅन चालक अक्षय प्रकाश गावंडे (रा. शिवनी रसुलापुर) याने गाडी रिव्हर्स घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या पाठलागामुळे त्याचा प्रयत्न असफल ठरला.
पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये भाजीपाल्याच्या खाली दारू असल्याचे समोर आले . पोलिसांनी दारू व ओमनी व्हॅन असा एकूण १ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी अक्षय गावंडे याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या नेतृत्वात केली.