अमरावती - दिल्ली येथील कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनावर दडपशाही करणाऱ्या शासकीय धोरणाचा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन गुरुवारी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
शासन यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू
केंद्र सरकारने शेतीसंबंधीचे मंजूर केलेल्या तीन कायद्यांविरोधात दिल्ली येथे काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांविरुद्ध शासन यंत्रणेकडून अत्याचार होत असून, त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या कृत्याचा महाराष्ट्र राज्य किसान संघर्ष समन्वय समितीने ३ डिसेंबरला निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून चांदूर रेल्वे येथील तहसील कार्यालयासमोर या समितीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व निदर्शने केली. तसेच केंद्र सरकार विरुद्ध व या कायद्याविरुद्ध घोषणाबाजी केली.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमाल खरेदी करावा
शेतीसंबंधीचे केंद्र सरकारने मंजूर केलेले कायदे शेतकऱ्यांना शेतीतून बेदखल करणारे व अन्यायकारक असल्याने ते मागे घ्यावे, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाची खरेदी करण्यात येणारा कायदा करावा. त्याकरिता शासनाने शासकीय यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'ती'चा वाद भोवला... औरंगाबादेत तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी
हेही वाचा - स्मृतिदिन विशेष : कवयित्री बहिणाबाईंना अभिवादन; चौधरी वाड्यातील संग्रहालयात कार्यक्रम