अमरावती - शहरालगतच्या छत्री तलाव जवळ दोन महिन्यांपूर्वी एका बिबट्याचे दर्शन झाले होते. अशाच प्रकारे काल रात्री सुध्दा एक बिबट्या रोडवर मुक्त संचार करताना नागरिकांना दिसला. यावेळी पळसखेड येथील अमोल नाखले व संजय पुनसे या युवकांनी या बिबट्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. या रोडवर बिबट्याचा मुक्त संचार होत असल्याने अमरावती पळसखेड चांदूर रेल्वे रोडवर बिबट्याची दहशद नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण -
दोन महिन्यांपूर्वी सुद्धा अमरावती ते भानखेडा या रस्त्यावर रात्री फिरायला जाणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. अमरावती शहराकडून भानखेडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक जंगली प्राणी वास्तव्यास आहेत. सोबतच बिबट्यासुद्धा येथे वास्तव्यास आहे. भानखेडा या गावाकडे जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी त्या बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये कैद केले होते. अमरावती-भानखेड मार्गावर सकाळी आणि सायंकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.