अमरावती : अमरावती शहरालगतच्या जंगल परिसरात अवघे दोन-तीन फेटराची वृक्ष आहेत. हे झाड अतिशय संवेदनशील आहे. ह्या झाडाच्या खोडाला गुदगुल्या केल्या की, त्या खोडाच्या जागेपासून जी फांदी नैसर्गिकरित्या जुळली आहे. ती फांदी आपोआप हलायला लागते. झाडाला गुदगुल्या केल्यावर ती फांदी अक्षरशः हसत आहे, नाचत आहे असाच अनुभव येतो. हे झाड अतिशय संवेदनशील असल्यामुळे या झाडांना गुदगुल्या होतात, असे जाणवत असल्याचे वनस्पती शास्त्राचा अभ्यास असणाऱ्या डॉ. अर्चना मोहोड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
कच्चे फळ औषध, पिकलेले विष : संवेदनशील असणाऱ्या फेटरा ह्या झाडाच्या फळांचे देखील आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. या झाडाला पेरूसारखे फळ येतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिया असतात. हे फळ सुरुवातीला हिरव्या रंगाचे आणि पिकल्यावर काळसर खाकी रंगाचे दिसतात. या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे, हे फळ कच्चे असले की ते खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत, मात्र हे फळ पिकल्यावर खाणे म्हणजे विष खाण्यासारखे आहे, असे डॉ. अर्चना मोहोड यांनी सांगितले. ज्या भागात दुष्काळ पडतो, त्या भागात या झाडाचे कच्चे फळ पाण्यात उकळून खाल्ले जातात. पश्चिम बंगालमध्ये असणाऱ्या सांथाल जमातीचे लोक दुष्काळात फेटराचे कच्चे फळ उकळून खातात, अशी माहिती देखील डॉ. अर्चना मोरे यांनी दिली.
'असे' आहेत औषधी गुण : फेटरा या झाडाचे अद्याप हवे तितके संशोधन झाले नाही. मात्र आता या झाडाचे संशोधन वेगात सुरू झाले आहे. या झाडांच्या मुळाचा वापर हा पोट दुखणे, अपचन होणे यासाठी औषध म्हणून केला जातो. पश्चिम बंगालमधील आदिवासी जमात लहान मुलांना या झाडाची मुळे औषधी म्हणून खाऊ घालतात. या झाडाच्या मुळांपासून मिळणाऱ्या सॅपोनिन या घटकाला पाण्यात भिजवले की, त्याचा फेस होतो. हा फेस तापाने फणफणलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लावला, तर त्या व्यक्तीचा ताप निघून जातो अशी माहिती देखील डॉ.अर्चना मोहोड यांनी दिली. फेटरा या झाडांमध्ये असणारा एक अर्क हा विषरोधक असून सर्पदंश झाल्यास या अर्काद्वारे मानवाच्या शरीरात गेलेले संपूर्ण विष बाहेर काढता येते. सापच नव्हे तर कुठल्याही प्रकारचा विंचू चावला असेल, तर त्याचे विष देखील तात्काळ बाहेर काढण्याची क्षमता फेटरा या झाडाच्या अर्कामध्ये आहे, अशी माहिती देखील डॉ.अर्चना मोहोड म्हणाल्या.
नैराश्यावरही औषध : सध्या तरुणांपासून वृद्धांपर्यंत नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी अनेक औषधी, गोळ्या खाल्ल्या जात आहेत. त्याचा दुष्परिणाम देखील जाणवायला लागला आहे. मात्र फेटराच्या झाडामध्ये असणाऱ्या अर्काद्वारे माणसांमधील नैराश्य कमी करणारे, नैराश्य कायमचे घालवणारे औषधी घटक देखील आहेत. मेडिकल सायन्सला सध्या नैराश्यावर मात करण्यासाठी माणसांना अपायकारक ठरणार नाही, अशा औषधींची गरज आहे. सध्या नैराश्यावर मात करण्यासाठी जी औषधे घेतली जातात, त्याचा किडनीवर वाईट परिणाम होतो आहे. रोग प्रतिकारशक्ती देखील कमी होत आहे. यामुळे फटरा या झाडांच्या द्रव्यात असणाऱ्या नैराश्यावर मात करणाऱ्या घटकांचा वापर माणसाच्या शरीरावर कुठलाही अपाय होणार नाही, अशा औषधी बनविण्यासाठी केला जातो आहे. मिर्गी या आजारावर मात करणारे औषध देखील पेटरा ह्या झाडामध्ये दडलेल्या औषधी गुणयुक्त द्रव्याद्वारे तयार केले जात आहे. मिर्गी हा आजार कमी करण्यासाठी हे झाड अतिशय गुणकारी आहे. किडनीच्या आजारावर देखील फेटरा हे झाड अतिशय महत्त्वाचे आहे, अशी माहिती देखील डॉ. अर्चना मोहोड यांनी दिली.
दुर्मिळ झाड वाचवण्याची गरज : फेटरा हे अतिशय दुर्मिळ झाड आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अमरावती शहरालगतच्या जंगलात केवळ तीन ते चार फेटराची झाडे अस्तित्वात आहेत. मेळघाटच्या घनदाट जंगलात देखील हे झाड सापडत नाही. भारतात महाराष्ट्रात काही भागात तसेच पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये हे दुर्मिळ झाड अतिशय कमी प्रमाणात आहे. या झाडांचे अस्तित्व कायम राहावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. गुदगुल्या झाल्यावर हसणारे हे झाड माणसाला अनेक व्याधीतून सुखरूप मुक्त करू शकते. यामुळे या झाडाचे जतन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे देखील डॉ. अर्चना मोहोड म्हणाल्या.