अमरावती : जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेसाठी चांदुर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक शाळेचा संघ तयारीला लागला असतानाच संघाची कर्णधार कल्याणी शिंदे हिच्या वडिलांचे स्पर्धेच्या दोन दिवस आधीच अल्पशा आधाराने निधन झाले. दुःखाचा डोंगर कल्याणीसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर पडले असताना महिनाभरापासून स्पर्धेसाठी सराव करणाऱ्या कल्याणीला तिच्या आईने आणि आजीने धीर दिला. आणि शाळेसाठी खेळायला पाठवले. वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कल्याणीने आपल्या शाळेसाठी उत्तमरीत्या खेळत उपविजेतेपद खेचून आणले. कल्याणीच्या या खेळीमुळे जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चांदुर रेल्वे तालुक्याचा बहुमान वाढला.
आई आणि आजीने दिले प्रोत्साहन : अल्पशा आजाराने कल्याणीचे वडील सतीश शिंदे यांचे 31 जानेवारीला निधन झाले. 2 डिसेंबरला अमरावती येथील जिल्हा क्रीडा मैदानावर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणी ही तिच्या निमगव्हाण येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या कबड्डी संघाची कर्णधार असल्याने संघाची संपूर्ण भिस्त ही कल्याणीवर होती. अशा परिस्थितीत आपल्या मुलीने गत महिनाभरापासून स्पर्धा जिंकण्यासाठी घेतलेली मेहनत वाया जाऊ नये, यासाठी कल्याणीची आई आणि आजी या दोघींनीही कल्याणीला धीर देत स्पर्धेत खेळण्याचे प्रोत्साहन दिले.
कल्याणीने विजयश्री आणली खेचून : कल्याणी आपल्या शाळेच्या संघासाठी मैदानावर उतरली आणि उत्कृष्ट खेळीद्वारे तिने आपल्या शाळेसाठी विजयश्री खेचून आणली. कबड्डी या खेळासह कल्याणी खो-खो रिले रेस या स्पर्धेत देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. कबड्डीच्या अंतिम सामन्यात धारणी विरुद्ध तिने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपल्या शाळेच्या संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. यावेळी स्पर्धेतील उपविजेते पदाचे पारितोषिक स्वीकारताना कर्णधार म्हणून विजयाचा आनंद आणि आपले कौतुक करण्यासाठी वडील नाही, हे दुःखाश्रू कल्याणीला अनावर झालेत. कल्याणीच्या या कामागिरीमुळे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
कुटुंबीयांची भूमिका प्रेरणादायी : जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत चांदुर रेल्वे तालुक्याने वैयक्तिक आणि सांघिक गटात प्रत्येकी एक उपविजेतेपद मिळविले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना कल्याणीच्या कुटुंबीयांनी घेतलेली भूमिका ही अतिशय प्रेरणादायी असल्याचे चांदुर रेल्वेचे गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनेकर तसेच कल्याणीचे शिक्षक अजय राऊत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे.