अमरावती - कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमरावतीची 'झेप मल्टिपर्पज फाउंडेशन' ही संस्था सरसावली आहे. येत्या 17 ऑगस्टला या फाउंडेशनतर्फे पूरग्रस्तांसाठी आवश्यक असणारे साहित्य, खाद्य आणि कपडे पाठविण्यात येणार आहेत.
'झेप मल्टिपर्पज फाउंडेशन'च्या विदर्भातील बुलडाणा, मलकापूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली, नांदगाव खंडेश्वर आदी विविध भागातून दैनंदिन गरजेचे साहित्य आणि धान्य अमरावतीला ट्रकद्वारे आणण्यात येत आहे. हे सर्व साहित्य 17 ऑगस्टला ट्रकद्वारे कोल्हापूरला पाठविले जाणार असल्याची माहिती झेप मल्टिपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण रुद्रकार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
सोमवारी मलकापूर येथून आलेले मदत साहित्य अमरावतीत ट्रकद्वारे आणण्यात आले. मंगळवारी पुसद, यवतमाळ आणि हिंगोलीसह अमरावती जिल्ह्यातील विविध भागातून साहित्य आणि धान्य अमरावतीत येणार आहे. हे सर्व मदत साहित्य शारदा नगर परिसरातील एका सभागृहात ठेवण्यात येत आहे. पुराचा जोर ओसरातच 17 ऑगस्टला हे साहित्य कोल्हापूरला पाठविले जाईल. पूर पीडितांसाठी कपडे, धान्य, जीवनावश्यक साहित्य दान करण्याचे आवाहनही प्रवीण रुद्रकार यांनी यावेळी केले. या उपक्रमात संस्थेचे संचालक कोमल राऊत, कपिल जोशी, राहुल यादगिरे, अमित चौबे, रुपेश भोसले, भावना मुंदडा, सारंग गौरखेडे आदी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.