अमरावती - शहरासह जिल्ह्यात बुधवारी (दि. 22 जुलै) दुपारी मुसळधार पाऊस बरसला. यावर्षी पावसाची झाड अद्यापही लागली नसली तरी शेतीसाठी मात्र समाधानकारक पाऊस जिल्ह्यात बरसला आहे.
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी झाला असला तरी तूर, सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका या महत्त्वाच्या पिकांसाठी उपयुक्त, असा पाऊस आतापर्यंत जिल्ह्यात पडला आहे. जिल्ह्यातील भातकुली आणि दर्यापूर तालुक्यात 20 दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस बरसल्याने काही गावे पाण्यात बुडाले होते. तो एक पाऊस सोडला तर जिल्ह्यात कुठेही मुसळधार पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पाऊस बरसल्यावर सातत्याने पाऊस काशी बरसलाच नाही. कधी जोरदार पाऊस बरसल्यावर दोन दिवास पावसाचा पत्ताच नाही, असा प्रकार या पावसाळ्यात अनुभवायला येतो आहे.
बुधवारी दुपारी 4 वाजल्यापासून मुसळधार पाऊस बरसायला लागला आहे. सायंकाळी 5 वाजता पावसाचा वेग थोडा मंदावल्यावर 5.30 वाजल्यापासून पुन्हा जोरदार पाऊस बरसायला लागला आहे. मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे अमरावती शहरातील दोन मुख्य तालावंसह शहरालगतचे सर्व तलाव सध्या तुडुंब भरले आहेत. मेळघाटातही आज पाऊस बरसत असून श्रावण महिन्यात मेळघाटात दररोज पाऊस बरसतो. मेळघाटसह अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शी, तिवसा, चांदुर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, दर्यापूर, वरुड, मोर्शी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बारसतो आहे. येत्या 24 तासात जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.