अमरावती - जिल्ह्यातील सेफ झोन असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यात एकाच दिवशी चार कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरवरील एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाली आहे.
अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आहेत. मात्र, कोरोनाचे रुग्ण नसणारे चांदूर रेल्वे हा एकमेव तालुका होता. मात्र, काही दिवसांपूर्वी अमरावती शहरात मूत्रपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ही व्यक्ती चांदूर रेल्वे तालुक्यातील रहिवासी होती. मात्र, या व्यक्तीचा कोणाशी संपर्क नसल्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होता. मात्र, गुरुवारी अचानक चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यामध्ये चांदूर रेल्वेमधील कोविड सेंटरवरील २६ वर्षीय पुरुष डॉक्टर, नगर परिषदमधील ४४ वर्षीय सफाई कर्मचारी, लालखेड येथील ३५ वर्षीय महिला व भिलटेक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिला या चौघांचा समावेश आहे. यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. तसेच कोरोनाबाधित आढळल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून विनाकारण घराबाहेर पडू नका व सर्व नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.